कोरोनाच्या काळात तुमच्या डेंटिस्टला भेट देताय ? काय खबरदारी घ्याल..

source 

कोरोना विषाणूची साथ यामुळे भविष्यातील अनिश्चितता आणि अनिश्चिततेसह सर्व जगावर आर्थिक,सामाजिक आणि मानसिक पातळीवर परिणाम होताना दिसत आहेत. भारतामध्ये अनलॉक करायची प्रक्रिया सुरु झाल्यापासून,देशात विशेषतः शहरी भागात कोरोनाचा संसर्ग आणखीच वाढत चाललेला आहे.इतक्या दिवसांपासून राज्यात खूप काही बंद होते त्यामध्ये 'दातांचे दवाखाने' ही! आता डेंटिस्टनीही आप-आपले दवाखाने चालू करायला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत आपला दांत दुखत असेल किंवा काही त्रास झाला तर आपण डेंटिस्टला सहजपणे भेट देत असू पण आतामात्र कॉरोनाच्या प्रादुर्भावानंतर ते पहिल्यासारखे शक्य होईल का?  ... 

source 


आपण उदाहरणार्थ श्री.पाटील यांचा विचार करूया. श्री.पाटील यांच्या दाढेमध्ये  एक पोकळी होती ,जी आता दुखू लागली, वेदना कमी करण्यासाठी स्वत:हुंन दांत दुखण्याचे औषधे घेतल्यानंतरही त्यांना बरे होत नसल्याने आता डेंटिस्ट कडे जाणे त्यांना गरजेचे झाले. कोरोना महामारीच्या काळात डेंटिस्ट कडे जाण्याअगोदर त्यांना काही शंका आहेत ... 


कोरोनाच्या काळात दंतचिकित्सकांना भेट देणे त्यांच्यासाठी  सुरक्षित आहे काय?
आपण कोणती खबरदारी घ्यावी ?
डेंटल क्लिनिकला भेट देणे  कितपत सुरक्षित ?
दंत रूग्णालयात किंवा उपचार प्रक्रियेदरम्यान काही बदल दिसु शकतात का ?
प्रक्रियेपूर्वी सर्व उपकरणे साफ केली जातील का?
दुखणाऱ्या दाताच्या ट्रीटमेंटसकट बाकीही काही ट्रीटमेंट करून घेणे कितपत शक्य आहे?

source 



दाताच्या दवाखान्याला भेट देण्याअगोदर अधिक खबरदारी का घ्यावी ?

आतापर्यंत तुम्ही दूरदर्शनवरून किंवा प्रसारमाध्यमांमधून कोरोना विषाणूचा हा आजार कसा पसरतो हे वाचलेले किंवा पाहिले असावे .. 

कोरोना संसर्ग झालेल्या एखादा व्यक्ती खोकला किंवा शिंकल्यास त्यांच्या तोंडातून उडालेले लाळेचे थेंब दुसऱ्या व्यक्तीच्या नाक,तोंड किंवा डोळ्याच्या संपर्कात आले कि तो व्यक्ती कोरोना संसर्गास कारणीभूत ठरू शकतो.ह्यासाठीच आपण शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे किंवा मास्क लावणे गरजेचे आहे. हेच कोरोना विषाणू अशाप्रकारे वस्तूंच्या पृष्ठभागावर साठून राहिले असता आणखीन संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरतात. 

डेंटिस्ट कडे जाण्याअगोदर तुम्हाला कोरोना विषाणू संसर्गाची चिंता करण्याची आवश्यकता आहे का? 

दाताचा इलाज म्हटला कि तुमच्या डेंटिस्ट ला तोंडामध्ये दातावर काम करावे लागते. डेंटिस्टचा दाताचा इलाजप्रक्रीयेदरम्यान लाळेशी संपर्क जास्त येतो. ज्यामुळे प्रक्रियेदरम्यान रोगाचा प्रसार किंवा क्रॉस इन्फेक्शनची शक्यता वाढते. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर शासनाने डेंटिस्टना केवळ निवडक दंत प्रक्रिया किंवा आपत्कालीन प्रक्रिया(emergency dental procedures ) पार पाडण्यासाठी परवानगी दिली आहे. (कोरोना संसर्ग सर्व देशभर जसजसा प्रगती करतो तसतसे हे नियम बदलू शकतात.)

आपत्कालीन दंत  प्रक्रिया (emergency dental procedures ) कोणत्या बाबतीत आहेत?

  • तीव्र दातदुखी 
  • दाताला भेग पडून दात दुखणे 
  • दाताभोवती सूज (हिरड्यांना  सूज)
  • ऑर्थोडोंटिक वायर किंवा उपकरणे यामुळे तोंड येणे किंवा त्रास होणे 
  • जुन्या कवळीमुळे होणार त्रास 
  • जुने सिमेंट निघणे किंवा भेग पडणे 


आपत्कालीन नसलेल्या दंतप्रक्रिया (non emergency procedures) काय आहेत?

  • दंत तपासणी (routine dental checkup)
  • दांत साफ करून घेणे (प्रोफेशनल क्लिनिंग ) आणि इतर प्रतिबंधित उपचार
  • कॅप बसवणे,नवीन दांत बसवणे 
  • दांत सफेद करून घेणे 
  • दातांमध्ये सिमेंट भरणे 

source 


डेंटिस्टला भेट देण्याअगोदर आपण काय काळजी घेणे आवश्यक आहे?

  • दवाखान्याला भेट देण्यापूर्वी दंत कार्यालयात दूरध्वनीद्वारे संपर्क करावा. 
  • तुमच्याबद्दलची सविस्तर माहिती फोनद्वारे कळवावी. 
  • उपचाराच्या १४ दिवसांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास आपल्या डेंटिस्टला कळवावे. 
  • अलीकडच्या काळात काही दूरचा प्रवास झाला असल्यास त्याची माहिती द्यावी. 
  • ऑनलाइन पेमेंटला नेहमीच प्राधान्य द्या.
  • इतर दांत कर्मचार्‍यांना तुमच्या उत्तम सेवेसाठी शांततेने  सहकार्य करा 
  • भेटीच्या (अपॉइंटमेंट) वेळेपेक्षा लवकर किंवा उशिरा पोहोचू नका.



आपण आपल्या डेंटिस्टला भेट देण्यापूर्वी  काय करू शकता? 


  • डेंटिस्ट ला भेटण्यापूर्वी घरीच दांत व्यवस्थित घासून या. 
  • फक्त चप्पल किंवा सँडल घालून यावे. 
  • हाफ स्लीव्ह शर्ट किंवा टी-शर्ट घाला (जेणेकरून आपण आपल्या हाताच्या कोपरापर्यंत सॅनिटायझरने  हात स्वच्छ करू शकाल)

  • शक्यतो एकट्यानेच भेट द्या.
  • अपॉईंटमेंट घेण्यापूर्वी कोणतेही दाताचे दुखणे कमी करण्यासाठीचे औषध घ्यायचे टाळा किंवा तुम्ही स्वतःहून घेतलेल्या औषधांच्या बाबतीत दंतचिकित्सकाला अद्ययावत ठेवा.
  • दवाखान्यात येण्यापूर्वी रस्त्यामध्ये कुठेही खरेदीसाठी अथवा कोणत्याही कामासाठी थांबू नका. 
  • शक्यतो स्वतःसोबत गरजेच्या वस्तूच जसे कारची चावी व मोबाइल फोन आणाव्यात. 




उपचारापूर्वी.. 


१) आपला हात कोपरापर्यंत सॅनिटाईज करावा. 

२) आपले तापमान शक्यतो इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासले जाईल.

३) आपणास संमती फॉर्म, कोविड डिक्लरेशन फॉर्म किंवा रूग्णाची  माहिती फॉर्मवर सही करण्यास सांगितले जाऊ शकते. 

उपचारादरम्यान.. 


चांगली दंतसेवा देण्यासाठी तुमच्या डेंटिस्ट ला सहकार्य करा. 

लक्षात ठेवा की दंतचिकित्सक संसर्ग नियंत्रणात (infection control) तज्ञ असतात!

दंतोपचारासाठी शासनाने डेंटिस्ट ना काही नियमावली दिलेली आहे ज्याचे सर्व डेंटिस्ट पालन करत आहेत . 
आपल्याला चांगली सुरक्षित दंत उपचार सेवा कुठून कशी मिळेल ह्या कडे लक्ष देणे आवश्यक आहे . 

              "तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक ही चांगली गुंतवणूक असते." 

source 

ह्या कोरोनाच्या काळात कठीण परिस्थितीत 'आपल्यासकट दुसऱ्यांना हा संसर्ग न होऊ देणे' हेही आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेवणे प्रत्येकाला महत्वाचे आहे. 
दाताच्या कोणत्याही दुखण्यामध्ये घाबरून जाऊ नका. सर्व डेंटिस्ट तुम्हाला मदत करायला तत्पर आहेत. मात्र डेंटिस्ट व इतर आरोग्य कर्मचारी जेवढी काळजी घेत आहेत तेवढीच काळजी तुम्ही ही घेतली पाहिजे. पुढील वेळी जेव्हा तुम्ही डेंटिस्टला भेट द्याल तेव्हा काही चिंता न करता,या सर्व गोष्टींचा विचार व पालन करून भेट देऊ शकता!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दांत काढून झाल्यानंतर या पांच गोष्टी करू नयेत ....

दांत काढल्यानंतर काय खावे व काय खाऊ नये ?

दातांचा इलाज एवढा महाग कसा?